मुंबई - राजधानीत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांसाठी गेल्या पाच वर्षात सुमारे 25 हजार झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिली. या तोडलेल्या झाडांच्या बदल्यात 4 लाख जपानी मियावाकी पद्धतीने झाडे लावली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - आझाद मैदान प्रकरण: 'माझ्या मुलीला कोणीतरी फूस लावत आहे, तिने पोलिसांसमोर जावे'
महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सन २०२० - २१ चा ३३ हजार ४४१.०२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. त्यावेळी अर्थसंकल्पावरील भाषणावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना चालू वर्षात 3 हजार 236 झाडे तोडण्याकरीता परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईमधील जागेच्या समस्येमुळे झाडांची संख्या वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी 65 उद्यान आणि भूखंडांवर येत्या वर्षात मियावाकी पद्धतीने 4 लाख झाडे लावण्यात येणार आहेत. खासगी विकासकांचे इमारतीचे आराखडे मंजूर करतेवेळी मियावाकी पद्धतीने लावण्याचा आग्रह धरण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मुंबईमधील झाडे तोडण्याबाबत बोलताना शिवसेनेची कथनी आणि करणीत फरक असल्याचे शिवसेनेबाबत महाराष्ट्राने नेहमीच अनुभवले आहे. २५ हजार झाडे तोडण्यासाठी मंजुरी देणारी शिवसेना वृक्ष संवर्धनासाठी मेट्रोच्या मुळावर का येते याचे स्पष्टीकरण शिवसेनेने द्यावे, असे आवाहन पालिकेतील भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केले आहे. मुंबईत विकास कामे सुरू असताना त्याआड येणाऱ्या झाडांना की विकासकामांना स्थगिती देणार? असा प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. आरेमध्ये काय झाले हे सर्वांना माहीत आहे, वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये रोज झाडे कापली जात आहेत. मुंबईच्या पर्यावरणासाठी झाडे पाहिजे आहेत. त्यासाठी जे आकडे दिले आहेत ते बरोबर नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.