मुंबई - मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान दिले जाते. गेले दीड वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून चांगले काम केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे बोनसच्या रक्कमेत पाचशे रुपयांची वाढ करत 16 हजार रुपये बोनस दिला जाणार आहे.
- कोरोनाशी लढा -
दिवाळी जवळ येताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बोनस अर्थात सानुग्रह अनुदानाची चर्चा सुरू होते. गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यापासून रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधून काढणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांना क्वारेंटाईन करणे, रुग्ण आढळून आलेला विभाग स्वच्छ करणे, लॉकडाऊन काळात मुंबईत अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, जंबो कोविड सेंटर व रुग्णालयात रुग्णांना वेळेवर औषधे, ऑक्सिजन आदींचा पुरवठा करणे, महामारीच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, मुंबई स्वच्छ ठेवणे आदी कामे पालिका कर्मचारी अधिकारी करत होते. यात पालिकेच्या सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
- 16 हजार रुपये बोनस -
कोरोना विषाणूशी लढा सुरू असताना मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये इतका बोनस देण्यात आला होता. यावर्षी परिस्थिती सुधारली असल्याने बोनसची रक्कम वाढवण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. मुंबईमधील कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाला असला तरी पालिकेला म्हणावा तसा महसूल मिळत नसल्याने पालिकेची आर्थिक स्थिती योग्य नाही. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मागील वर्षापेक्षा 500 रुपयांची वाढ करून 16 हजार रुपये इतका बोनस दिला जाणार आहे. याची घोषणा मुंबईच्या महापौर उद्या बुधवारी करणार असल्याचे समजते.
हेही वाचा - BMC कामगारांइतके सानुग्रह अनुदान BEST कामगारांना द्या; बेस्ट कामगार सेनेची मागणी