मुंबई - होळी निमित्त मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते. झाडांची कत्तल रोखण्यासाठी पालिका वेळोवेळी आवाहन करते तसेच कारवाईही करते. यावर्षीही पालिकेकडून होळीनिमित्त झाडे तोडल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आणि आणि एका वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा -
पर्यावरण जपणे व जोपासणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. यानुसार सर्वांना ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे सर्वांना आवश्यक आहे. याच अनुषंगाने ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत करण्यात आलेल्या विविध तरतुदींमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास / तोडण्यास कारणीभूत होणे, हा कलम २१ अन्वये अपराध आहे. यानुसार अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये १,०००/- पासून रुपये ५,०००/- पर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच यासाठी एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठीच्या वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
वृक्षतोड करु नये -
याबाबत उद्यान अधीक्षक परदेशी यांनी पर्यावरण जोपासण्याचे आवाहन करताना सांगितले आहे की, येत्या १७ मार्च २०२२ रोजीच्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये. कोणत्याही प्रकारची अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘होळी’ च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना कळवावे, असेही आवाहन परदेशी यांनी केले आहे.
हेही वाचा - अकोल्यात आदिवासी संघर्ष समितीकडून 'त्या' शासन निर्णयाची होळी