मुंबई - मुंबईत मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी राहतात. फेरीवाले आपले बस्तान मांडून बसतात. फेरीवाल्यांमुळे फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी मिळत नाहीत. यावर उपाय म्हणून पालिकेने फेरीवाल्यांवर विरोधात मोहीम उभारली आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेकडून ॲप बनवले जाणार आहे. त्यात नागरिकांचा सहभाग घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी दिली.
फुटपाथची पाहणी -मुंबईमध्ये फुटपाथवर फेरीवाले बसतात. वाहने पार्क केली जातात. फुटपाथवर अतिक्रमण केले जाते. यामुळे फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी मिळत नाहीत. पालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई केली तरी पुन्हा ते फुटपाथवर अतिक्रमण करतात. फुटपाथवर अतिक्रण झाल्याने नागरिकांना त्यांच्या हक्काचे फुटपाथ मिळत नाहीत. त्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने उपाययोजना राबविता येतील, हे अभ्यासले जाणार आहे. त्यासाठी, स्वत: अतिरिक्त पालिका आयुक्त शर्मा हे विविध प्रभागातील फुटपाथची पाहणी करत आहे. त्यांनी ‘ए’, ‘बी’, ‘ई’ आदी काही प्रभागातील फुटपाथची पाहणी केली आहे. शहर भागासह उपनगरातील फुटपाथही अतिक्रमणमुक्त होण्यासाठी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाहणी करणार आहेत.
ॲपचा असा होणार फायदा - पालिकेच्या नवीन प्रस्तावित अॅपमध्ये अतिक्रमण झालेले फुटपाथ, न दिसणारे फुटपाथ, अशा विविध गोष्टी नमूद होऊ शकतात. त्यामुळे, पालिकेला फुटपाथविषयी इत्यंभूत माहिती गोळा करता येणार आहे. त्या आधारे, पालिकेस संपूर्ण मुंबईतील फुटपाथविषयी आढावा घेणे शक्य होणार आहे. मुंबईकरांनी केलेल्या तक्रारींवरील उपाययोजना, तक्रारीची नेमकी स्थिती समजू शकणार आहे.