मुंबई - महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जूनला निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व उपाययोजना समन्वयाने करण्यात येत आहेत. मुंबईकर नागरिकांनी देखील आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने त्याचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ ३ जूनला पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून समवेत जोरदार पाऊस देखील कोसळू शकतो. ही स्थिती लक्षात घेता महापालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज करण्यात आले आहेत. तटरक्षक दल, नौदल, मुंबई अग्निशमन दल यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके सुसज्ज करण्यात येत आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून तातडीने हाती घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. मुंबईतील महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विभागातील संभाव्य धोका पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसेच सखल भागातील वसाहती निश्चित करुन तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छीमार व इतरांनी देखील समुद्रात जाऊ नये, समुद्रकिनाऱ्यापासून लांब रहावे, झाड आणि खांब यांच्याखाली नागरिकांनी उभे राहू नये, वादळाच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू नये, अशी विनंती करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मुंबईतील मोठ्या औद्योगिक आस्थापना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांनी आपली यंत्रणा व सामुग्री सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. मुंबईतील सर्व रुग्णालयांनी जनरेटर कार्यान्वित आहेत, याची दक्षता घेऊन वीजपुरवठा अखंड सुरू राहील, याची तजवीज करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आवश्यक साधने जवळ बाळगावीत आणि वैयक्तिक स्तरावर देखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या संकटात आता 'निसर्ग'चे महासंकट; आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज