मुंबई - राज्यात लॉकडाऊन लागल्यापासून मंदिरे बंद करण्यात आली आहेत. मात्र, केंद्रसरकारने घोषीत केलेल्या अनलॉकनुसार धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांत मंदिरे उघडण्यात आली. मात्र, राज्यात अजूनही धार्मिक स्थळे बंद आहेत. याचपार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने राज्यव्यापी 'उद्धवा दार उघड' आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत देखील अनेक मंदिरांच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - वीज बिल माफीच्या प्रस्तावावर वित्त विभागात अंधार
'कोरोना काळात या सरकारनं राज्याची पार वाट लावली. जसं आम्ही सोशल डिस्टनसिंग ठेवत आता सर्वत्र जातोय, तसं मंदिरात खबरदारी घेत आम्ही दर्शन घेऊ. कोरोना काळात अनेक दिवसांपासून भाविक घरीच आहेत, देवावर त्यांची अपार श्रद्धा आहे. त्यांना अनेक दिवसांपासून आपल्या भगवानाचे दर्शन घ्यायचे आहे. मात्र, त्यांना शांत स्थळी जाता आलेलं नाही. तसेच तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्यांचाही राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारचे कान उघडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. असे भाजपा आमदार कॅप्टन सेलवन यांनी घंटानाद आंदोलनावेळी सांगितले आहे.
या आंदोलनात मंदिरांचे पुजारी, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. भाजपचे हे घंटानाद आंदोलन महाराष्ट्रभर सर्वत्र सुरू आहे. मुंबईतील दादर सिद्धिविनायक मंदिर, वडाळा विठ्ठल मंदिर, सायन हनुमान मंदिर, दहिसार श्री गणेश मंदिर अशा विविध तीर्थस्थळी भाजपकडून आंदोलन सुरू आहे.
हेही वाचा - 'केंद्रात सत्तेत आहात ना, मग माझ्यासारख्या फकिराला का मदत मागता?'