मुंबई - केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे. तसेच नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. असे असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी भारतीय जनता पक्षाला पुन्हा मंदिरांचे राजकारण करायचे आहे. नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार? असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लगावला आहे.
भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रा केल्या जात आहेत. या जन आशिर्वाद यात्रेत कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आले नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपाचे बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत, असा चिमटाही सचिन सावंत यांनी ट्विट करत काढला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात उत्सवावर निर्बंध घालावेत, असा निर्देश दिला आहेत. मात्र सुपरस्प्रेडर भाजपा स्वार्थी राजकारणाकरिता सामान्य जनतेचा जीव धोक्यात घालत आहे. भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात. कुठलीही दया दाखवू नये, असही सचिन सावंत म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्ष मंदिर उघडण्यासाठी आग्रही असून राज्यभरात अनेक ठिकाणी मंदिरांच्या बाहेर भारतीय जनता पक्षाकडून मंदिर उघडण्याबाबत आंदोलन करण्यात आली आहेत. भारतीय जनता पक्षाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी 30 ऑगस्टला ही राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे.
हेही वाचा - ...म्हणून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक एकत्र येत नाही - चंद्रकांत पाटील