मुंबई - कार्यकर्तेच पक्षाला विजयी करतात. त्यामुळे पक्षासाठी निस्वार्थीपणे काम करणारे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दुर्लक्षिले जाणार नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. जुन्या कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी एक व्हिडियो प्रसारित केला आहे. यामध्ये भाजप हा कार्यकर्त्यांची जाणीव ठेवणारा पक्ष आहे, असे ते म्हणाले. तसेच कार्यकर्ता हाच पक्षाचा पाया, आधार आणि कळस आहे, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. या त्यांच्या वक्तव्यावरून भाजपला अंतर्गत फुटीची भीती जाणवत असल्याचे दिसत आहे.
सध्या सत्ताधारी पक्षांकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग चालू असल्याने पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे भाजपला विधानसभा निवडणुकीआधीच अंतर्गत फुटीची भीती आहे. यामुळे भाजपातील मोठ्या नेत्यांनी जुन्या कार्यकर्त्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे.
हेही वाचा काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश; गणेश नाईक, कृपाशंकर सिंह अद्याप वेटींगवर
गेल्या निवडणुकीत 122 पैकी 110 आमदार हे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमधून झाल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले. तसेच भाजपच्या ३० मंत्र्यांपैकी राधाकृष्ण विखे-पाटील वगळता सर्व भाजपचे राज्य स्तरावरील काम करणारे कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले. जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, पक्षात आलेल्या नवीन लोकांमुळे बिथरून जाण्याचे कारण नाही, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा काँग्रेसला दिवसभरात तिसरा धक्का.... कृपाशंकर सिंहांनीही सोडली 'हाताची' साथ
बाहेरून येणाऱ्यांना पक्षाने तिकिटासाठी प्राधान्य दिल्यास भाजपला अंतर्गत फुटीला सामोरे जावे लागू शकते. यामुळे पक्षाकडून प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात येत आहेत.