मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माघारीमुळे माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने रणजितसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षात प्रवेश दिला आहे. मात्र या दोघांनाही उमेदवारीचे आश्वासन देऊनही अद्याप उमेदवाराची घोषणा भाजपने केली नाही.
राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. तर दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्तिथीत भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापूरचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देशमुख यांनी निंबाळकर यांच्या हातात भाजपचा झेंडा देऊन त्यांचा पक्ष प्रवेश करुन घेतला.
यावेळी देशमुख यांनीही निंबाळकर यांच्या पक्ष प्रवेशाने भाजप माढ्यात मजबूत झाल्याचा उल्लेख केला. माढा मतदार संघात मोहिते पाटील आणि निंबाळकर घराणे यांची ताकद एक झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माढ्यात विजय निश्चित असल्याचा दावा केला. मात्र माढ्यात उमेदवारी कोणाला हे गुलदस्त्यात्तच ठेवले आहे.
माढा मतदार संघात पाण्याच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने कशी सापत्न वागणूक दिली, याचा उल्लेख रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच केला होता. आज रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. या दोन्ही नेत्यांना भाजपने माढा मतदार संघात उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ईटीव्ही भारतने विचारणा केली असता, पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. कोणत्याही एका रंजितसिंहाला उमेदवारी मिळाली, तरी विजय भाजपचाच होणार असल्याचे जुजबी उत्तर निंबाळकर यांनी दिले.