मुंबई - भाजपाचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप ( MLA Laxman Jagtap ) हे आजारी असून सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज ( सोमवारी ) विधान भवनात पोहचले. पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथून ॲम्बुलन्समधून त्यांनी थेट विधान भवन ( Vidhan Bhavan ) गाठले. वास्तविक मागील १० तारखेला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा ते ॲम्बुलन्समधून विधान भवनात मतदानासाठी आले होते. आजही सकाळी साडेदहा वाजता पुण्याहून ते मतदानासाठी निघाले व दुपारी सव्वा दोन वाजता ते विधान भवनात दाखल झाले.
'पक्षावर असलेली एकनिष्ठा व त्यांची जिद्द' : विधान भवनात आल्यानंतर विरोधीपक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर गिरीश महाजन, प्रवीण दरेकर या भाजपाच्या सर्व नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मतदानाला येऊ नका, असे लक्ष्मण जगताप यांना सांगितले होते. पण तरीसुद्धा पक्षावर असलेली एकनिष्ठा व त्यांची जिद्द या कारणासाठी ते मतदानाला हजर झाले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुक्ता टिळकांनी बजावला मतदानाचा अधिकार : लक्ष्मण जगताप यांच्या अगोदर पुण्याच्याच कसबा पेठ येथील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी सुद्धा व्हीलचेअरवर येऊन मतदानाचा अधिकार बजावला. मुक्ता टिळक या सुद्धा बऱ्याच दिवसापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत आहेत.