मुंबई - पूजा चव्हाणला न्याय मिळवून देईपर्यंत आपण शांत बसणार नाही, असे वक्तव्य भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी माध्यमांसमोर करत आमदार संजय राठोड यांच्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
'स्वत:च्या फायद्याचा भाजपाचा प्रयत्न'
चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरण हे लावून धरले होते. तसेच वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांचा राजीनामासुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. आता या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणांमध्ये बंजारा समाजाची बदनामी होते का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात होता. त्यावर बंजारा समाजातील काही नेते यांनी चित्रा वाघ यांच्यावर आरोपसुद्धा केले होते, की स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हा सगळा मुद्दा भाजपाचे नेते उकरून काढत आहेत.
'तिच्यासोबत अत्यंत चुकीचे घडले'
या सगळ्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्या म्हणाल्या, कोणता समाज माझ्यावर कोणती टीका करतो याची मला पर्वा नाही. मला फक्त आणि फक्त पूजा चव्हाण या तरुणीला न्याय मिळवून द्यायचा आहे. कारण तिच्यासोबत अत्यंत चुकीचे घडले आहे आणि एक सत्ताधारी व्यक्तीने हे सगळे घडवून आणले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीलाही शिक्षा झालीच पाहिजे. त्याकरिता मी हा आक्रमक पवित्रा सोडणार नाही.