मुंबई - कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेली जम्बो कोविड सेंटर ही भ्रष्टाचाराची कुरणं ठरत आहेत. मुंबई पालिकेने रुग्णांना जम्बो फॅसिलिटी कोविड सेंटर मध्ये हलविण्याचा जो आटापिटा सुरू केला आहे. ते रुग्णांच्या सुविधांसाठी नसून हा केवळ कंत्राटदारांची पोटे भरण्याचा खटाटोप असल्याचा आरोप भाजपाचे पालिकेतील गटनेते व नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केला.
दहिसरमध्ये असलेल्या जम्बो सेंटरमध्ये पाण्याचा अभाव आहे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये कोविड रुग्णांसाठी उभारलेल्या जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये पाणी नाही म्हणून त्या ठिकाणच्या तरुण रुग्णांना डायपर दिले जाते, ही मोठी शोकांतिका आहे. याचा जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणच्या आमदार मनीषाताई चौधरी व त्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक तेथे गेले असता, तेथे वैद्यकीय सुविधाही अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी डॉक्टर नाहीत, इंजेक्शन्स नाहीत आणि औषधेही नाहीत. अशा प्रकारच्या जम्बो सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना हलविण्याचा डाव हा केवळ कंत्राटदारांची पोटे भरण्यासाठी असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
मुलुंड येथे एक मोठे जम्बो फॅसिलिटी कोविड सेंटर उभारण्यात आले. सोळाशे रुग्णशय्यांची क्षमता असलेल्या त्या जम्बो सेंटरमध्ये केवळ ८५ रुग्ण आहेत. म्हणजे पाच टक्के रुग्णसुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले नाहीत. तेथील रुग्णसंख्या वाढावी म्हणून प्रशासनाने मुलुंड पूर्व मिठागर येथे सर्व सुविधांनी युक्त असलेले, महानगरपालिकेच्या ताब्यात असलेले आणि वाजवी खर्च असलेले सेंटर बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मिठागरचे सेंटरमधील रुग्ण जम्बो सेंटरमध्ये हलवण्याचे काम सुरू आहे. या जम्बो सेंटरमध्ये भरमसाट खर्च होतो आणि तो कंत्राटदारांची पोटे भरण्यासाठी होतो. हे उपद्व्याप कशासाठी चालले आहेत, याचा जाब मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांनी द्यावा, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.