मुंबई - सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी जे डब्लू मॅरिएट व इतर पंचतारांकित हॉटेल आहेत. या हॉटेलांनी पालिकेकडून देण्यात आलेल्या भूखंडावर नागरिकांना विविध सुविधा देणे गरजेचे होते. मात्र या हॉटेल भूखंडांचा वापर आपल्या सोयीसाठी करत असून त्यामुळे पालिकेचा महसूल बुडत आहे, असा आरोप भाजप नगरसेवक अभिजीत सामंत यांनी केला आहे. पालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने महसूल वाढीसाठी हे भूखंड पालिकेने ताब्यात घेऊन हॉटेलांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी सुधार समितीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली आहे.
हॉटेलला पालिकेने दिलेल्या भूखंडापैकी ४० टक्के भूखंडीवर नागरिकांना विविध सोयी सुविधा देणे बधनकारक होते. मात्र, ४० टक्के जागा देण्यास नकार असल्याने हॉटेलांनी न्यायालयात धाव घेतली. नव्या धोरणाप्रमाणे पालिकेला २० टक्के भूखंड देणे गरजेचे होते. मात्र या २० टक्के जागेवर हॉटेलने एसटीपी प्लान्ट उभारला आहे. त्यामुळे नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी किंवा उद्यान उभारण्यासाठी भूखंड पालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे पालिकेला मिळू शकणारा बुडत असल्याचे सामंत यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
जे डब्लू मॅरिएट प्रमाणेच त्याबाजूला असलेल्या इतरही पंचतारांकित हॉटेलकडून असाच प्रकार केला जात आहे. यामधून पालिकेला दोन ते अडीच लाख चौरस फूट भूखंड मिळू शकला असता. पालिकेला भूखंड ताब्यात न देता याचा वापर संबंधित हॉटेलकडून करण्यात येत असल्याने त्यामधून पालिकेला महसूल मिळत नाही. दरम्यान, महसूल बुडवणाऱ्या हॉटेलवर कारवाई करावी, असे निर्देश सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिले आहेत.