मुंबई : भाजपने महाविकास आघाडी सरकारवर सोमवारी सोशल मीडियातून हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार लबाड असून सरकारनं जनतेला त्रस्त करून सोडल्याची टीका भाजपनं केली आहे. ट्विटरवर एकामागोमाग एक असे ट्विट करत भाजपनं राज्य सरकारवर टीका केली आहे.
भाजपचे ट्विट
"लबाड महाविकास आघाडी सरकारनं जनतेला चहूबाजूंनी त्रस्त करून सोडलं आहे. जनसामान्य, शेतकरी, वीजग्राहकांना शॉक अशा कारनाम्यानंतर या सरकारनं आदिवासींबाबतही कशी फसवेगिरी केली, हे आता स्पष्ट झालेलं आहे. हे सरकार न्याय देईल, अशी आशा कुठल्याच समाजघटकाला आता वाटत नसेल." असे ट्विट भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आले आहे.
वाझे प्रकरणावरूनही टीका
याशिवाय सचिन वाझे प्रकरणावरूनही भाजपने शिवसेना आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. "सचिन वाझे यांना १० दिवसांची NIA कोठडी मिळाली. पोलिसांची इनोव्हा तिथे कशी? अटक झालेले वाझेच या प्रकरणाचे तपास अधिकारी कसे? संजय राऊत वाझेंना पाठीशी का घालताहेत? वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली? ठाकरे सरकार, हे सगळं स्पष्ट होईल, हिरेन कुटुंबाला न्याय मिळेल!" असे ट्विट भाजपच्या अकाऊंटवरून करण्यात आले आहे.
सोयीच्या राजकारणाची टीका
याशिवाय "सोयीचं राजकारण - शिवसेनेच्या लाडक्या सचिन वाझे यांचा सहभाग होता, ते मनसुख हिरेन प्रकरण तपास NIAकडे देण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. खासदार संजय राऊत यांनीही मुंबई पोलिस, ATS सक्षम वाटत होतेच. मात्र, भीमा कोरेगावचा तपास त्याच मुख्यमंत्र्यांनी परस्पर NIAकडे दिला..." असे दुसरे ट्विटही भाजपच्या अकाऊंटवरून करण्यात आले आहे.
शेतकरी कर्जमाफी, वीजबिलाच्या मुद्द्यावर भाजपच्या नेत्यांनी विधानसभेत मांडलेल्या प्रश्नांसंदर्भात ट्विट टाकूनही भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा - 'सचिन वाझेंना कोणत्या तत्त्वावर पुन्हा मुंबई पोलीस दलात रुजू केले? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे'