मुंबई - महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक ( Nawab Malik Arrested ) केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीकडून या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे, तर भाजपकडून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची ( BJP agitation on minister Nawab Malik ) मागणी होत आहे.
मुंबईत मालाड येथे भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी मालाड येथे भाजप आमदार अतुल भातळकर यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी भाजप आमदार अतुल भातखळकर यांना ताब्यात घेतले.
जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
नागपुरात नवाब मलिक यांचा पुतळा जाळला
भाजपच्या वतीने नागपुरात झाशीराणी चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. भाजपच्या युवामोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी नवाब मलिक आणि डॉन दाऊद याचा पुतळा जाळला. पोलीस हा पुतळा विझवत नाही तेच लक्ष हटताच सोनिया गांधी यांचा दुसारा पुतळा जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध भाजपडून करण्यात आला.
नाशिकात भाजपचे आंदोलन, मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी
राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली असून त्यांनी तात्काळ मंत्री पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी करत भाजपने पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
अकोल्यात खुले नाट्यगृह चौकामध्ये भाजपचे आंदोलन
मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपने अकोल्यात त्याच मुद्द्याला धरून मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा मागितला आहे. त्यासाठी त्यांनी आज खुले नाट्यगृह चौकामध्ये आंदोलन केले. नवाब मलिक राजीनामा द्या, अशा घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचा राजीनामा घ्यावा, भाजपची मागणी
नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहेत. औरंगाबादेत देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
सोलापुरात भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी या केंद्रीय तपास संस्थेने अटक केली होती त्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात असून एका कॅबिनेट मंत्र्याला अटक झाली आहे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी करत सोलापूर भाजपच्या पदाधिकऱ्यांनी भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अमरावतीत भाजपचे राजकमल चौकात आंदोलन
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक ( Nawab Malik Arrested ) केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. याप्रकरणानंतर भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राजीनाम्याची मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन केले.