मुंबई - काश्मीरमध्ये 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार यावर आधारित चित्रपट "द काश्मीर फाइल्स" (The Kashmir Files) आणि पावनखिंड चित्रपट टॅक्स फ्री (Tax Free) करण्यात यावा, यासाठी भाजपच्या 92 आमदारांनी (BJP Mla Letter) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र दिले आहे. या पत्रातून या चित्रपटाला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. उद्या (16 मार्च) अर्थमंत्री अजित पवार यावर सकारात्मक भूमिका घेतील असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
विनाशकाले विपरीत बुद्धी -
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर आज दाखल करण्यात आलेला गुन्हा म्हणजे राज्य सरकारला विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्य सरकारकडून धमक्या देण्याचा कार्यक्रम सुरू असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांना समन्स देण्याऐवजी, भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना समन्स दिला जात आहे. इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली. त्यामुळे सूड घेणारे राज्य सरकारचे रूप जनतेला समजत असल्याचा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला लगावला.
मलिक निर्दोष सुटल्यास त्यांना मुख्यमंत्री करा -
कुर्ल्यातील विवादित जमीन प्रकरणात दाऊद इब्राहिम याचा संबंध असल्याची माहिती असताना देखील राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी जाणून-बुजून तो जमिनीचा व्यवहार केला. त्यामुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, पुढे नवाब मलिक जर निर्दोष सुटले तर राज्य सरकारने त्यांना मुख्यमंत्री करावे. मात्र आता त्यांचा राजीनामा राज्य सरकारने घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला आहे.