नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद ( Navi Mumbai International Airport Dispute ) शिगेला पोहचला आहे. लोकनेते दि. बा. पाटील ( D. B . Patil ) यांचे नावं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी आता एल्गार पुकारला आहे. विमानतळाच्या नामकरण व इतर मागण्यांसाठी भूमीपुत्रांनी सनदशील मार्गाने अनेक आंदोलने केली आहेत. मात्र सिडको व राज्य सरकारकडून भूमिपुत्रांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनी कामबंद आंदोलन ( Agitation of Workers ) केले. त्यासंदर्भात अगोदरचं घोषणा केली होती.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणा संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी सरकारला 23 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र लोकनेते दि.बा पाटील नामकरणा संदर्भात कोणताही निर्णय न झाल्यास 24 जानेवारीपासून विमानतळाचे काम बंद पाडण्याचा निर्णय भूमिपुत्रांनी घेत कामबंद आंदोलन केले.
कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन -
27 गाव प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली 23 जानेवारीपर्यंत याबाबत काहीच निर्णय न झाल्याने 24 जानेवारीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सुरू असलेले काम बंद करण्याचा निर्णय भूमिपुत्रांनी घेतला होता. त्याअनुषंगाने हे कामबंद आंदोलन करण्यात आले. आत्तापर्यंत केवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरण आंदोलनाचे केवळ राजकारण केले गेले आहे, असा रोष भूमिपुत्र व्यक्त करत आहेत. प्रकल्पबाधित 27 गावातील नागरिक एकत्र येत नामकरणाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना बाहेर फेकून देऊ व जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका भूमिपुत्रांनी व्यक्त केली आहे.