मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे उद्घाटन सोहळा पार पडलेला. मात्र, मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत व्हिक्टोरिया बग्गीकरिता पार्किंग आणि चार्जिंगसाठी रितीसर जागा उपलब्ध न करून दिल्यामुळे व्हिक्टोरिया बग्गी अडचणीत सापडली असतांनाच, या बग्गीवरून राजकारण सुरू झाले आहे. भाजपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाटनी व्हिक्टोरिया बग्गीवरून मुख्यमंत्र्यांना लक्ष करत बालहट्ट असल्याचा टोला मारला आहे.
मुख्यमंत्री आदर्श पिता -
बाल हट्टापुढे प्रत्येक पिता हा विवश असतो. पर्यटन मंत्रालय देऊन सुद्धा बाल हट्ट पूर्ण झालेला नाही. आता मुंबई शहरामध्ये इलेक्ट्रिक विक्टोरिया बग्गीत बसून सफर करायची आहे. या बालहट्टासाठी कुठलाही परवाना आणि पार्किंगची व्यवस्था नाही. इतकेच नव्हे तर महापालिका आणि वाहतूक यंत्रणा त्यासाठी तयार नसतात सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक आदर्श पिता म्हणून या बग्गीचे उद्घाटन केले आहे. मुख्यमंत्र्यांना बाल हट्टामुळे नाइलाजास्त या बग्गीचे उद्घाटन करावे लागले आहे, असा टोला मुंबई महानगर पालिकेचे भाजपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी लगावला आहे.
स्टँड उपलब्ध करून देण्याची मागणी -
व्हिक्टोरिया बग्गी दक्षिण मुंबईत पुन्हा धावायला सज्ज आहे. मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला असून सॅनिटायझर आणि इतर कामेही आता पूर्ण झालेली आहे. मात्र, महापालिकेकडून व्हिक्टोरिया पार्क करण्यासाठी आणि चार्जिंगसाठी एक जागा किंवा स्टँड उपलब्ध करून देण्याची मागणी कंपनीने केली आहे. घोडागाडी बंद झाल्याने ज्या व्हिक्टोरिया मालकांचे नुकसान झाले होते, त्यांस नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी ४ लाख रुपये प्रशासनाकडून देण्यात येणार होते. मात्र, इलेक्ट्रिक व्हिक्टोरियाच्या रुपात संबंधित चालकांना पुन्हा रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने या प्रकल्पास सहकार्य करावेत असे म्हणणे उबो राईड्जचे आहे.