मुंबई- अँटिलिया इमारतीच्या जवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझें या अधिकाऱ्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक करून वेगळ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. 2002 घाटकोपर बॉम्ब स्फोटमधील आरोपी ख्वाजा युनूस याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यास मुंबई पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. तब्बल 17 वर्षे निलंबित असलेल्या सचिन वाझेला कोरोना संक्रमणाच्या नावाखाली तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलीस खात्यात 2020 मध्ये पुन्हा सामावून घेतले होते. मात्र, गुन्हेगारी कारवाया व खुनाचा आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला 17 वर्षानंतर पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेत असताना अशा पोलीस अधिकाऱ्याची मानसिक स्थिती कशा प्रकारची आहे याची चाचपणी करणे गरजेचे असल्याचे मुंबई पोलीस खात्यातील माजी ज्येष्ठ पोलीस अधिकारी अॅडव्होकेट धनराज वंजारी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - तुम्ही सर्कस चालवित आहात की सरकार? काँग्रेसचा केंद्रीय अर्थमंत्र्यांना टोला
पोलीस आयुक्त पदावर राहून परमबीर सिंग यांना कायद्याचे अज्ञान
मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना परमबीर सिंग यांना कायद्याचे अज्ञान होते, असेही धनराज वंजारी यांचे म्हणणे आहे. ख्वाजा युनूसच्या मृत्यू संदर्भात निलंबित झालेला सचिन वाझे व 2007 लखनभैय्या एन्काउंटर प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या व सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगताना पेरोलवर बाहेर असलेल्या विनायक शिंदे या दोन अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. या प्रकाराला कुठे ना कुठे तरी परमबीर सिंग हे स्वतः जबाबदार असून, गृहमंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर परमबीर सिंग यांनी का केला नाही? असा प्रश्नही धनराज वंजारी यांनी विचारलेला आहे.
सचिन वाझे संदर्भात खुनशी प्रवृत्ती नाकारता येत नाही -
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक होण्याअगोदर सचिन वाझे याने त्याच्या मोबाईल व्हॉट्सअॅप स्टेटसवर त्यास 17 वर्षांपूर्वी चुकीच्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला होता. 17 वर्षानंतर पुन्हा पोलीस सेवेत आल्यानंतर सचिन वाझे याच्याकडून जे काही घडले ते खुनशी वृत्तीमुळे घडलें असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं धनराज वंजारी यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - खासदार किरण खेर यांना रक्ताचा कॅन्सर, अनुपम खेर यांनी दिला बातमीला दुजोरा