मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर भागात अन्नभेसळ करणारे कसे सक्रिय आहेत आणि ते तुमच्या जीवाशी कसा खेळ करत आहेत हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईतून समोर आले आहे. स्वयंपाकातील सर्वात महत्वाचा घटक असणाऱ्या खाद्यतेलात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे विभागाच्या कारवाईतून निष्पन्न झाले आहे. एफडीएने 16 जानेवारीला मुंबई आणि ठाणे परिसरात धाड टाकत 4 कोटी 98 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला असून यातील 50 टक्के खाद्यतेलाचे नमुने अप्रमाणित अर्थात भेसळयुक्त असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.
अशी झाली कारवाई
अन्न आणि अन्न पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून नियमितपणे कारवाई केली जाते. खाद्यतेलात सध्या मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली. त्यानुसार एफडीएने व्यापक स्वरूपात कारवाई करण्याचा निर्णय घेत मुंबई तसेच ठाण्यात 16 जानेवारीला कारवाई केली. या कारवाईत विभागाचे एकूण 30 अन्न सुरक्षा अधिकारी आपल्या टीमसह सहभागी झाले. या टीमने बोरिवली, गोरेगाव, वाशी, मीरारोड, वसई, भिवंडी, पालघर अशा ठिकाणच्या तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांवर धाडी टाकल्या. यात सुमारे 4 कोटी 98 लाख 74 हजार 973 रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केल्याची माहिती सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे.
93 पैकी 49 नमुने अप्रमाणित
एफडीएने जप्त केलेल्या खाद्यतेलाचे एकूण 93 नमुने तापणसीसाठी पाठवले होते. याचा अहवाल नुकताच आला असून मुंबई आणि ठाणे परिसरात विकले जाणारे 50 टक्क्यांहून अधिक खाद्यतेल हे भेसळयुक्त, अप्रमाणित असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. अगदी शेंगदाणा तेलापासून तिळाच्या तेलापर्यंत सर्व प्रकारच्या खाद्यतेलात भेसळ होत असल्याचेही यावेळी समोर आले. आता नियमानुसार संबंधितांविरोधात पुढील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारे भेसळ करून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खाद्यतेल खरेदी करताना आता अधिक काळजी घेणे ग्राहकांसाठी गरजेचे आहे.
आता राज्यभर अशी मोहीम
मुंबई-ठाण्यात विकले जाणारे 50 टक्के खाद्यतेल भेसळयुक्त असल्याची बाब चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे आता मुंबई-ठाण्यात खाद्यतेलाच्या नियमित तपासण्या होणार आहेतच, पण आता राज्यभरही अशी मोहीम राबवत खाद्यतेलाची तपासणी करण्याचा निर्णय एफडीएने घेतला आहे. तर ब्रॅण्डेड खाद्यतेलाचीही तपासणी आता केली जाणार आहे.
खाद्यतेल तपासणी अहवाल
तेल | एकूण नमुने | अप्रमाणित नमुने |
---|---|---|
शेंगदाणा तेल | 11 | 06 |
मोहरी तेल | 19 | 12 |
तीळ तेल | 05 | 05 |
सूर्यफूल तेल | 20 | 12 |
पामोलिन तेल | 13 | 04 |
कॉटन सीड तेल | 02 | 02 |
कॉर्न तेल | 01 | 01 |
वनस्पती तेल | 01 | 01 |
राईस ब्रान तेल | 10 | 10 |