मुंबई - नसरी मोनजी विद्यापीठाच्या सुनंदन दिवाटीया स्कूल ऑफ सायन्सने एक नवा शोध लावला आहे. या शोधामुळे कोरोना नष्ट होईल, असा दावा सुनंदन दिवाटीया स्कूल ऑफ सायन्सने केला आहे. या शोधात त्यांनी एक अनोखा मास्क बनवला आहे. मास्कवर कोरोना अथवा म्युकर मायकोसिसचा विषाणू आल्यास तो तात्काळ नष्ट होईल, असं सुनंदन दिवाटीया स्कूल ऑफ सायन्सकडून सांगण्यात आलंय. या मास्कला 'TP 100' असं नाव देण्यात आले आहे. TP म्हणजे 'टोटल प्रोटेक्शन'.
मागील 8 महिन्यापासून अशाप्रकारच्या मास्कच्या संशोधनावर नरसी मोनजी विद्यापीठाचे सुनंदन दिवाटीया स्कूल ऑफ सायन्सचे डीन डॉ. नितीन देसाई आणि प्राध्यापक डॉ. वृषाली जोशी मास्क निर्मितीचे काम करत आहेत. सध्या हा मास्क पूर्ण झाला असून त्याचे दोन पेटंट सुद्धा मिळाल्याचे डॉ. नितीन देसाई सांगतात. या मास्कची निर्मिती स्वत: नरसी मूनजी विद्यापीठ करणार आहे. मार्केटिंग विभागामार्फत या मास्कची किंमत ठरवली जाणार आहे. याची किंमत साधारण: 800 ते 1000 रुपयांपर्यंत असणार असल्याचे डॉ. नितीन देसाई सांगतात. या मास्कची वॉरंटी तब्बल एका वर्षाची असल्याचे सांगण्यात आले आहे.
हा मास्क दोन लेअरमध्ये आहे. तर या मास्कच्या आत कॉपरची एक जाळी आहे. ती जाळी बॅटरी सोबत जोडली आहे. या जाळीला कॉपर फिल्टर असं म्हणतात. सामान्य मास्क एअर फिल्टर करते मात्र विषाणू नष्ट करु शकत नाही. TP 100 या मास्कमध्ये घड्याळाचे सेल असलेले एक सॉकेट आहे. ते सॉकेट कॉपरच्या जाळीला जोडलं गेलंय. सॉकेटचे बटन दाबताच त्यातून 3 वोल्टचा करंट सप्लाय होतो. त्यामुळे जर मास्कवर एखादा विषाणू आला तर तो तात्काळ करंटमुळे न्युट्रल म्हणजेच नष्ट होतो. त्यामुळे पूर्णपणे आपल्याला प्रोटेक्शन मिळेल. असे या मास्कची निर्मिती करणारे प्राध्यापक डॉ नितीन देसाई यांनी सांगितलं.
वॉशेबल मास्क -
सामान्य मास्क आपण वॉश करुन पुन्हा वापरू शकतो. तसेच युज अँड थ्रो वाले मास्क आपण वापरून फेकून दिल्यास बायो गार्बेजची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र या हा मास्क कॉपर फिल्टर काढून वॉश करु शकतो. तसेच तीन वोल्टचा सप्लाय दिल्यामुळे शरीराला इजा होणार नसल्याचे देखील नितीन देसाई यांनी सांगितलं आहेत. त्यामुळे हा मास्क पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगण्यात आलंय.