मुंबई : सचिन वाझे प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आता मुंबईतील काही बियर बार मालकांची चौकशी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता बार मालकांकडून कोणत्या गोष्टींचा खुलासा होतोय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाझेच्या मोबाईलच्या सीडीआरमधून बार मालकांसंबंधी माहिती -
मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टीलिया इमारतीच्या बाहेर स्कॉर्पिओ आढळली. त्यात स्फोटके आणि धमकीचे पत्र सापडले. यासंदर्भात एनआयएने पोलिस अधिकारी सचिन वाझेला अटक केली. सचिन वाझेचा मोबाईलही जप्त करण्यात आला. त्याता मोबाईलच्या सीडीआरमधून काही माहिती मिळाली. ती मुंबईतील बियर बार मालकांच्या संबंधीत असल्याचे समजते आहे.
सचिन वाझेने बार मालकांना पैशांसाठी धमकावायचा ? -
सचिन वाझेच्या मोबाईल सीडीआरमधून मिळालेल्या माहितीवरून मुंबईतील काही बार आणि रेस्टॉरंट मालकांना एनआयएने समन्स बजावले होते. त्यामुळे एनआयएने आता मुंबईतील काही बार मालकांना बोलावून त्यांची चौकशी केली. त्या चौकशीत, सचिन वाझेने बार मालकांना पैशांसाठी धमकावले जात होते, असे समोर आले आहे.
"वाझेने पैसे मागितल्याची कोणतीही तक्रार नाही" -
रेस्टॉरंट आणि बियर बारची संघटना असलेल्या आहारचे प्रवक्ते शिवानंद शेट्टी यांनी या संदर्भात माहिती दिली. 'त्यांच्या संघटनेकडे अशा प्रकारची कुठलीही माहिती नाही. जर एखाद्या पोलिस अधिकाऱ्याकडून पैशांसाठी संघटनेतील सभासदांना धमकाविले जात असेल, तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून संबंधित विभागाला त्याची तक्रार केली जाते. शिवाय, कारवाईचीही मागणी केली जाते. मात्र, आतापर्यंत आहार संघटनेच्या कुठल्याही सभासदांनी अशा प्रकारची तक्रार केलेली नाही', असे शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.
सचिन वाझेकडून मोबाईल व सिम कार्ड नष्ट -
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझेने नष्ट केलेले चार मोबाईल फोन आणि सिम कार्डचा शोध घेतला जात आहे. नरेश गोर या क्रिकेट बुकीकडून गुजरातमधून बनावट कागदपत्रांच्या आधारावर सिमकार्ड मिळवण्यात आलेले होते. या 11 सिम कार्ड पैकी 4 सिम कार्ड व मोबाईल फोनचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणा घेत आहेत.
सचिन वाझे काय आहे प्रकरण ?
मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टीलिया इमारतीच्या बाहेर स्कॉर्पिओ आढळली. त्यात स्फोटके आणि धमकीचे पत्र सापडले. ही गाडी, त्यातील स्फोटके आणि धमकीचे पत्र मीच ठेवले होते, अशी कबुली सचिन वाझेने दिली आहे. याप्रकरणी एनआयएने सचिन वाझेला अटक केली आहे.
वाझेला महिना 100 कोटी वसुलीचे गृहमंत्र्यांचे आदेश -
वाझेला महिना 100 कोटी वसुली करण्याचे आदेशही गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले होते, असे गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहेत. याप्रकरणी परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयातही गेले होते. पण, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जावे, असा सल्ला परबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
परबीर सिंग यांचे आरोप बिनबुडाचे -
मात्र, 'परमबीर सिंग यांचे हे सर्व आरोप खोटे आहेत. त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. त्यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्याने त्यांनी हे आरोप केले आहेत. पाहिजे तर ठाकरे सरकारने माझी चौकशी करून "दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे"', असे गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटले आहे.
हेही वाचा - वाझे प्रकरणाचे धागेदोरे कलानगरच्या बंगल्यापर्यंत जातील - निलेश राणे
हेही वाचा - 'मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी नाही होणार!' दीपाली चव्हाण प्रकरणात नवीन ट्विस्ट