मुंबई - 1 मे पासून राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मोफत लसीकरणाच्या श्रेयवादावरून लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर कॉंग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लसीकरण मोफत करण्यात यावे अशी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची इच्छा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
1 मे पासून राज्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. त्यातच हे लसीकरण मोफत केले जाईल असे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये मोफत लसीकरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये सुरू असलेली ही श्रेयवादाची लढाई योग्य नसल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. राज्यात सर्वांचे लसीकरण हे मोफत केलं जावं, अशा प्रकारची मागणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आधीच केंद्राकडे केली होती. त्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेतील असा देखील विश्वास बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत लसीकरण संदर्भात निर्णय जाहीर करण्याधीच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरणाबाबत घोषणा केली, ते योग्य नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
राज्यातील जनतेचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. गेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मोफत लसीकरणासंदर्भात चर्चा झाली. यावेळी एकमत झाले असून, राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला आहे. लवकरच मोफत लसीकरणासाठी टेंडर काढले जातील, असे मलिक यांनी सांगितले. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करून मोफत लस देणार असल्याचे म्हटले. मात्र, काही वेळातच आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट करून सुधारित ट्विट केल्याचे पाहायला मिळाले.
राज्य सरकारला लसीकरणाचे नियोजन करावे लागेल
एक मेपासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्रावर नियोजन करावे लागणार असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. 45 वर्षांवरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी उमडली होती. त्याचप्रमाणे एक मे नंतर देखील गर्दी होऊ शकते. त्यामुळे त्याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - पतीने मुलांसमोर केले पत्नीवर ब्लेडने वार, चौथ्या मजल्याहून मारली उडी, दोघांचाही मृत्य