मुंबई - राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करणार आहे. मात्र त्यांना समजून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कमी पडले, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
शरद पवार यांनी मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या कामात सातत्य नसल्याचे एका मुलाखतीत सांगितले. यानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनीही पवारांवर भाष्य केले होते. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांना टोला लगावलाय.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही ते मान्य करतो. परंतु ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले, असे आम्हाला वाटते. यामुळेच काँग्रेसमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे. राहुल गांधी यांनी आपल्या आयुष्यात दुःख पाहिले, जे आघात सोसले,त्यातून ते उभे राहून देशाच्या सेवेसाठी कार्य करत आहेत. आणि हेच राहुल गांधी अत्यंत यशस्वीपणे पुढील वाटचाल करणार असल्याचा आम्हाला विश्वास आहे, असे थोरात म्हणाले.
...म्हणून कृषि कायद्याविरोधात भूमिका
भाजपाच्या प्रवक्ते आणि नेत्यांकडून काँग्रेसच्या काळातच बाजार समित्या आणि इतर कृषी क्षेत्रातील खासगीकरणाचे कायदे आणण्यात आल्याचा प्रचार केला जातोय. याबाबत प्रत्युत्तर देताना, भाजपाचे प्रवक्ते हे बोलण्यात फसवतात, असे थोरात म्हणाले. भाजपाचे नेते बोलून दिशाभूल करण्यात अत्यंत हुशार आहेत. आम्ही जो कायदा करत होतो, तो शेतकऱ्यांच्या हितासाठी होता. यांचा कायदा मात्र या देशातील मूठभर भांडवलदारासाठी आहे, असा आरोप थोरात यांनी केलाय. म्हणून आमचा विरोध असल्याचे त्यांनी म्हटले.
कायद्यामधून समस्त देशातील शेतकरी उध्वस्त होणार असून केवळ भांडवलदाराचे हित साधले जाणार आहे. त्यामुळे आम्ही या कायद्याविरोधात शेतकऱ्यांसोबत असल्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
काय म्हणाले शरद पवार?
देशाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे सातत्याची कमतरता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुण्यातील एका आयोजित कार्यक्रमात याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार बोलत होते. मात्र, त्यांनी बराक ओबामा यांनी राहुल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला बगल दिली.
मंत्री यशोमती ठाकूरही मैदानात
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर काँग्रेसच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करणे टाळा, असा सल्ला महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्य नाही, असे वक्तव्य पवार यांनी एका मुलाखतीत नुकतेच केले होते. त्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी ट्वीट करत पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.