मुंबई - राज्यात ओल्या दुष्काळामुळे एकूणच परस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळायला हवी, म्हणून आम्हीही राज्यपालांकडे मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघातील दुष्काळाचा आढावा घेत मदत करावी, अशा सूचना केल्या असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज मुंबईत दिली.
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज काँग्रेसकडून विधानभवन परिसरात असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर थोरात यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. थोरात म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
बुधवारी काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली. सर्वसमावेशक असा कार्यक्रम काय असावा याबाबत चर्चा झाली. किमान समान मुद्दे यावर आमची चर्चा पुढे होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित चर्चा होऊन अजेंडा तयार झाल्यावरच शिवसेनेशी चर्चा केली जाईल, असेही थोरात म्हणाले. त्यामुळे सत्ता स्थापनेचे डेडलॉक लवकरच दुरहोईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस नेत्यांनी पंडित जव्हारलाल नेहरू यांना अभिवादन केले. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार हुसनबानू खालीफे उपस्थित होते, यावेळी बाळासाहेब थोरात यांनी बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.