मुंबई - मुंबईतल्या मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सिग्नल यंत्रणा बिघडल्याने तसेच रुळांखालची खडी आणि माती वाहून गेली असल्याने बदलापूर ते कर्जत दरम्यान लोकल सेवा बंद करण्यात आली आहे.
मागील 24 तास 100 हून अधिक कर्मचारी बदलापूर कर्जत भागात आणि कर्जत लोणावळा घाट विभागात काम करत आहेत. रात्री उशिरापर्यंत या भागात वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.
रविवारच्या मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कसारा मार्गावरील लोकल सोमवारी सकाळी 7.30च्या सुमारास पूर्वपदावर आली. मात्र नेरळ-शेलू यादरम्यान सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बदलापूर ते कर्जत लोकल सेवा अजूनही बंद आहे.
सीएसएमटी-कर्जत मार्गावरील लोकल सकाळी 10 च्या सुमारास बदलापूरपर्यंत सुरू केली. मध्य रेल्वेद्वारे कर्जत ते पनवेल लोकल सुरू केली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. रविवार पासून रखडलेल्या मेल, एक्सप्रेस सोमवारी सुरू झाल्याने प्रवासी इच्छितस्थळी सुखरूप पोहचले.