मुंबई - कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पदवी, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा रखडल्या असतानाच आज मुंबई विद्यापीठाने पदवीच्या अखेरच्या सत्रात शिकत असलेल्या आणि मागील वर्षी एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यापीठाने मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयामुळे अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत निकाल मिळून त्यांच्या करिअरची पुढची वाट अधिक सुकर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मार्च महिन्यात कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्वच विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या परीक्षा रखडल्या आहेत. या परीक्षांच्या संदर्भात नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोगाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही नेमलेल्या समितीने शिफारशी जाहीर केल्या होत्या. या सर्वाचा विचार करून मुंबई विद्यापीठाने सोमवारी परिपत्रक काढले आहे.
परीक्षा जुलैमध्ये, ग्रेडिंगनुसार मुल्यांकन
मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या तसेच अंतिम सत्रातील परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. याअनुषंगाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या घ्यावयाच्या परीक्षा, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा, ग्रेडींग पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करुन निकाल जाहीर केला जाणार आहे. पीएचडी आणि एमफिलच्या विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ अशा अनुषंगिक बाबीसंदर्भात विस्तृत स्वरुपात माहिती या परिपत्रकात देत त्यात स्पष्टता आणण्यात आली आहे.
लॉकडाऊनचाही कालावधी धरला जाणार
जुलै, २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या १३ मार्च, २०२० पर्यंत शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहेत. या परीक्षेला उपस्थितीची अट राहणार असून लॉकडाऊनचा कालावधी हा उपस्थित असल्याचे ग्राह्य धरले जाणार आहे. प्रथम, द्वितीय वर्षाचे मूल्यांकन अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोडून इतर विद्यार्थ्यांचे मुल्यमापन ग्रेडींग पद्धतीनुसार ( ५० टक्के अंतर्गत व ५० टक्के मागील सत्रातील गुण ) करुन निकाल जाहीर करण्यात येईल व त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल, त्यांच्या अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा ही महाविद्यालय, विद्यापीठ संस्था, विद्यापीठ शैक्षणिक विभाग सुरू झाल्यानंतर १२० दिवसाच्या आत घेण्यात येणार असल्याची माहिती आज विद्यापीठाकडून देण्यात आली.
या सत्राच्या होणार परीक्षा
दोन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या वर्षाची परीक्षा, तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी तिसऱ्या वर्षाची परीक्षा, चार वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी चौथ्या वर्षाची परीक्षा, सत्र पद्धतीतील दोन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी ४ थ्या सत्राची परीक्षा, तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी ६ व्या सत्राची परीक्षा, चार वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी ८ व्या सत्राची परीक्षा, पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी १० व्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.
वार्षिक पद्धतीतील एक वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी पहिल्या वर्षाची परीक्षा