मुंबई - खासदारांना घेऊन देवदर्शनाऐवजी नालेसफाई केली असती, तर मुंबई बुडाली नसती असा खोचक टोला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. पावसामुळे मुंबईच्या झालेल्या दूरवस्थेवर बोलताना त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुंबई महापालिकेत सलग दोन दशके सत्ता असतानाही जनतेला मुलभूत सोयी-सुविधा देण्यात शिवसेना अपयशी ठरली आहे. विकास तर दूरच पण नियोजनशून्य कारभार आणि अनिर्बंध भ्रष्टाचारामुळे मुंबई अधोगतीच्या गाळात बुडत आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची लूटमार सुरू असताना स्वयंघोषित ‘पहारेकरी’ही झोपेचे सोंग घेऊन निवांत बसला आहे, असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला वेसन घालण्याचे धाडस भाजपमध्ये नाही. त्यामुळे मुंबईकर आता ‘रामभरोसे’ झाल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
मागील दोन दिवस संपूर्ण मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. तरी मुंबई सुरळीत असल्याचा दावा महापौर करतात. मुंबई कुठे तुंबली, असा प्रतिप्रश्न केला जातो. त्यांची दृष्टी कदाचित अधू झाली असावी. महापौरांची ही विधाने संवेदना मेल्याचे निदर्शक आहे. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी समुद्राच्या भरती-ओहोटीवर खापर फोडून तर कधी जास्त पाऊस झाल्याचा बहाणा सांगून शिवसेना दरवेळी नामानिराळी होण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण मुंबई शहरासह खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या कलानगरात प्रचंड पाणी तुंबते. तळमजल्यावर राहणारे लोक आपले किंमती सामान सुरक्षित ठिकाणी हलवतात. किमान ते बघून तरी 'आम्ही मुंबई बुडवून दाखवली' याची जाहीर कबुली देऊन शिवसेनेने जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.
मालाड, कल्याण, पुणे आदी ठिकाणी भिंत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या २६ हून अधिक नागरिकांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली. या बळींसाठी पावसाइतकाच भ्रष्टाचारही कारणीभूत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. सरकार या भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या सर्व दोषींना कदाचित नेहमीप्रमाणे 'क्लीन चीट' देईल. आर्थिक मदत देण्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल. पण त्याने गेलेले जीव परत येणार आहेत का ? घरातील कमावते व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना खरा आधार मिळणार आहे का ? पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, याची हमी मिळणार आहे का ? असे अनेक प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले.