मुंबई - राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून त्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. उपाययोजनांसाठी केवळ कागदावर आकडे दाखवले जात असून प्रत्यक्षात दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नाही त्यामुळे सरकारने आता अधिक अंत पाहू नये, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज दिला.
मुंबईत गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांची आणि त्याच्यावर ओेढवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. काही दिवसापूर्वी कॉंग्रेसने दुष्काळग्रस्त भागाचाआढावा घेण्यासाठी उपसमित्या नेमल्या होत्या. त्यांचे खूप धक्कादायक अहवाल आला असल्याचे सांगत अशोक चव्हाण यांनी सरकार व जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनता नाकारत आहे. तसेच त्यांच्या मन की बातलाही लोकांनी नाकारले आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळेच ते पत्रकार परिषद घेत आहेत, असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.
राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार आणि फळबागायत शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, ज्या ठिकाणी चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरची मागणी केली जात आहे, त्या ठिकाणी ती पुरविली जावी आदी मागण्याही त्यांनी यावेळी केल्या. तसेच यापूर्वी जाहीर झालेले अनुदाने तात्काळ द्यावीत, रोजगार हमीची कामे तातडीने स्थानिकांना उपलब्ध करून द्यावीत अशीही मागणी त्यांनी केली. आजपर्यंत राज्यात उपाययोजनांबाबत प्रत्यक्ष शब्दच्छल सुरू आहे, अंमलबजावणी मात्र शून्य आहे. दुष्काळग्रस्तांकडून सरकारने मते घेतली, परंतु त्यांची परिस्थिती काय? आहे हे पहिले नाही अजूनही सरकाराला जाग आली नाही असा आरोपही चव्हाण यांनी केला.
राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. केंद्राकडून ४ हजार ३०० कोटी आले, परंतु ते गेले कुठे ते कशासाठी वापरले गेले याची जिल्हानिहाय माहिती द्यावी अशी मागणी करत यात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी पंचनामे होत नाहीत. पाणी, रोजगार आणि चारा या मुद्द्यावर सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात इतका दुष्काळ पडला असल्याने जलयुक्त शिवाराचे पैसे गेले कुठे? असा सवाल करत चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. टँकर नियमित गावात येत नाहीत, अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवले जाते रोजगार हमी कामाचे बिले प्रलंबित आहेत. अनेक गावांनी चारा छावण्याची मागणी केली आहे, त्यांना ती द्यावी. धुळ्यात एका मुलीचा पाण्याच्या शोधात गेली असता तिचा जीव गेला, तिला दहा लाखांची मदत करावी आज राज्यात केवळ दहा हजार लोकांना काम मिळेल इतकीच सोय केली आहे, आमच्या काळात लाखो लोकांना मागेल तिथे काम दिले जायचे पण या सरकारची तशी मानसिकता दिसत नसल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.
राज्यात स्थलांतर होत आहे, त्याची माहिती सरकारने जाहीर करावी.पूर्वी दीड हजार रुपयांनी मिळणारा चारा आज पाच हजार रुपयांना झाला असल्याने लोक चारा छावण्या लावत नाहीत त्यामुळे त्यावर उपायोजना करावी आदी मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.
मुंबईत काँग्रेसची २० मे रोजी बैठक होत असून त्यात विधानसभेचा गटनेता आणि विरोधीपक्ष नेते पदावर चर्चा होणार आहे. नुकतेच राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे हे भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. ते निवडणुकीच्या प्रचारापासूनही अलिप्त होते. त्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच पक्षाकडून निर्णय घेतला जाणार आहे. तर राज्यात ज्या लोकांनी पक्षाच्या विरोधात जाऊन काम केले त्यांचा अहवाल लवकरच येणार असून त्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आज पत्रकार परिषद घेत असल्याच्या संदर्भात त्यांना विचारले असता चव्हाण म्हणाले की, पराभव दिसत असल्याने मोदी आता पत्रकार परिषद घेत आहेत, त्यांच्या मन की बात ला लोकांनी नाकारले आहे. त्यामुळे आज ते समोर येत असल्याची टीका त्यांनी केली.