मुंबई - मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आज मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत दरवर्षी महापालिका शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करते. त्यानुसार यंदाही करण्यात आला. मात्र, मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपा नेते अशिष शेलार यांनी, 'शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरू आहे,' अशी खोचक टीका शिवसेनेवर केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. येथील शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत केली. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दृष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा आहे. शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरू आहे!'
मुंबईत कालपासून आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यासह ठिकठिकाणी गुडघ्याएवढं पाणी साचले आहे. तसेच सांताक्रूझ, अंधेरी यासह पश्चिम उपनगरात घरांमध्ये पाणी शिरले आहे. दरवेळेस पालिका नालेसफाईचा दावा करते. मात्र थोड्याशा पावसात ही मुंबईची तुंबई होते. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे.