मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये गेल्या 25 दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये अटकेत आहे. आर्यन खानला उच्च न्यायालयात जामीन मिळाला तरीदेखील आजची रात्र आर्यनला जेलमध्येच राहावे लागत आहे. आर्यन खानची जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला सेशन कोर्टात पोचली तेव्हा एक पासपोर्ट फोटो कमी पडल्यामुळे आर्यनला आजची रात्र जेलमध्ये राहवे लागणार आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गुरुवारी (28 ऑक्टोबर) हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला. हायकोर्टाकडून आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजेच शुक्रवारी त्याची जेलमधून सुटका होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण काही कारणास्तव आर्यनची जेलमधून सुटका होऊ शकली नाही. आर्यनची जेलमधून सुटका न होण्यामागील नेमकं कारण काय ते आता समोर आले आहे. अभिनेत्री जुही चावला आर्यन खानच्या जामीनदार म्हणून सेशन कोर्टात हजर झाली, मात्र एका पासपोर्ट फोटोमुळे आर्यन खानची शुक्रवारी जेलमधून सुटका होऊ शकली नाही.
हे ही वाचा - पोपटाचा धंदा माझा नाही नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही - अल्पसंख्यांक मंत्री
आर्यनच्या जामीनासाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार म्हणून सेशन कोर्टात शुक्रवारी संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास दाखल झाली. यावेळी आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात आले होते. त्यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. तसेच जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली. यावेळी कोर्टात जुहीचं आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर करण्यात आले. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. पण जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडल्याने जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशिर झाला.
नियमानुसार जामीनासाठी जामीनदाराचे दोन फोटो जरुरीचे असतात. पण दोन फोटो नसल्याने या प्रक्रियेला उशिर झाला. यावेळी कोर्टाने वकिलांना फटकारले. जामीनाची सर्व प्रक्रिया माहिती असताना जामीनदारांना त्याबाबत आधी माहिती देणं अपेक्षित होतं, असं न्यायाधीशांनी वकिलांना सुनावलं. त्यानंतर जुहीचे आणखी एक पासपोर्ट साईज फोटो मागविण्यात आला.
आर्यनचा जेलमधील मुक्काम वाढला -
दुसरीकडे आर्यनची जेलमधून सुटका व्हावी, यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर असलेल्या जामीन पत्रपेटीत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जामीनाचे सर्व कायदेशीर कागदपत्रे पोहोचणे अपेक्षित होतं. ही पेटी संध्याकाळी साडेपाचपर्यंत बंद होते. पण साडेपाच वाजेपर्यंत सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडू शकली नाही. या कायदेशीर प्रक्रियेला उशिर झाल्याने त्याचे कागदपत्रे जेलबाहेरील जामीन पत्रपेटीत पोहोचू शकले नाही. त्यामुळे आर्यनचा जेलमधील मुक्काम आणखी एका रात्रीने वाढला.
आर्यनच्या स्वागतासाठी 'मन्नत'वर रोषणाई -
आर्यनची जेलमधून सुटका व्हावी यासाठी वेगवेगळ्या घडामोडी आपापल्या जागेवर घडत होत्या. आर्यन खानच्या स्वागतासाठी शाहरुख खानचा बंगला मन्नत लायटिंगने सजवण्यात आला. शाहरुख आर्यनला घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलच्या दिशेला रवाना होणार होता. शाहरुख येणार म्हणून त्याला आणि त्याच्या मुलाला पाहण्यासाठी चाहत्यांनी ऑर्थर रोड जेलबाहेर मोठी गर्दी केलेली होती. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ऑर्थर रोड जेलबाहेर तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर मन्नतबाहेरही शाहरुखच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली होती.