मुंबई - अंगणवाडी सेविका, मदतनिसांची मानधन वाढ आणि अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करण्यात आली. मात्र, सरकारने या मागण्यांची अद्याप दखल घेतलेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी रक्षाबंधन जवळ असल्याचे पाहून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर धडकणार आहेत.
बालवाडीची अंगणवाडी झाली तेव्हापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचारी सातत्याने आंदोलने करत असतात. मात्र, सरकारने याची दखल घेतली नाही. पण आता रंक्षाबंधन जवळ आल्याचे पाहून या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांनी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसात या मागण्या मान्य न झाल्यास, १५ ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर धडकणार आहेत. व तिथेच रक्षाबंधन साजरा करणार आहेत.
अंगणवाडी सेवकांच्या मागण्या -
- कर्मचाऱ्यांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन योजना लागू करा.
- अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी रजिस्टर आणि अहवाल फॉर्म द्या.
- वर्षातून पंधरा दिवसांची आजारपणासाठी पगारी रजा हवी.
- आवश्यक ठिकाणी रिक्त जागी बदली करा.
- मानधनात वाढ करा.
- सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्या.
- सेवासमाप्ती लाभाच्या रकमेत तिप्पटीने वाढ करा.