मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु आहे. या लसीकरणादरम्यान आतापर्यंत कोणालाही मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले नव्हते. मात्र आज एका 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत अंधेरी येथील खासगी रुग्णालयात घडली. लसीकरणानंतर मृत्यू होण्याची ही मुंबईमधील पहिलीच घटना आहे.
कोरोना लसीकरण -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्याचे पालिका प्रयत्न करत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान कोणावरही मोठे दुष्परिणाम झाले नसल्याचे दिसून आले. लस घेतल्यावर ताप येणे, लस दिलेला हात दुखणे असे प्रकार समोर आले. हे सर्व सौम्य दुष्परिणाम आहेत. लसीकरणानंतर ताप येणे ही सामान्य बाब आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
वृद्धाचा मृत्यू -
दरम्यान आज सोमवारी दुपारी अंधेरी येथील खाजगी रुग्णालयात एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीला लस टोचण्यात आली. लस टोचल्यावर त्या व्यक्तीला चक्कर आली. त्या व्यक्तीला दुपारी 3.50 च्या सुमारास आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल केले असता सायंकाळी 5 वाजता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचे शवविच्छेदन केल्यावर त्याच्या अहवालावरून मृत्यूचे नेमके कारण समजू शकते अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
आतापर्यंतचे लसीकरण -
मुंबईत 16 जानेवारीपासून आतापर्यंत 3 लाख 90 हजार 938 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 1 लाख 62 हजार 598 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 11 हजार 78 फ्रंटलाईन वर्कर, 1 लाख 5 हजार 867 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वयातील गंभीर आजार असलेल्या 11 हजार 395 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज सोमवारपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 34 हजार 572 वर पोहचला आहे. मृतांचा आकडा 11 हजार 504 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 11 हजार 407 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 779 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 225 दिवस इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 34 लाख 34 हजार 610 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - राज्यात सोमवारी 8 हजार 744 नवे कोरोनाबाधित; 22 रुग्णांचा मृत्यू