मुंबई - बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना माघारी पाठवण्यासाठी तीन चार्टर्ड विमानांची व्यवस्था केल्याची माहिती मिळत आहे. एका वृत्त संस्थेने दिलेल्या बातमीनुसार, अमिताभ यांनी मुंबईत अडकलेल्या ५०० परप्रांतीय मजूरांना गावी जाण्यासाठी विमानांची सोय केली. संबंधित विमानांनी वाराणसीला उड्डाण केले.
यासाठी अमिताभ बच्चन यांच्या उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार अमिताभ बच्चन यांना संबंधित मदतीबद्दल गुप्तता ठेवायची होती. बुधवारी सकाळी वाराणसीकडे जाणाऱ्या 'इंडियन एअरलाइन्स'च्या विमानाने आणखी १८० मजूरांना माघारी पाठवण्यात येणार आहे. या सर्वांना रेल्वेने पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी वाहतुकीची साधने उपलब्ध न झाल्याने त्यांना विमानाने गावी पाठवण्यात आले. तसेच येणाऱ्या काळात आणखी दोन विमाने उत्तर प्रदेशला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.