मुंबई - भारतीय रेल्वे सेवेतील तेजस एक्सप्रेस बंद होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. कोविड काळात प्रतिसाद नसल्याने 'तेजस'च्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आता प्रशासनाने 24 नोव्हेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेच्या खासगीकरण निर्णय प्रक्रियेला मोठा धक्का बसला असून देशाताल पहिल्या तेजस या खासगी एक्सप्रेसच्या फेऱ्या बंद करण्याची वेळ मंत्रालयावर आली आहे. या बहुचर्चित एक्सप्रेसला अवश्यक प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. पुढील सूचना मिळेपर्यंत दिल्ली ते लखनऊ आणि मुंबई ते अहमदाबाद या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयआरटीसी प्रशासनाने कळवले आहे.
प्रतिसाद नसल्याने निर्णय
येत्या 23 नोव्हेंबरला दिल्ली ते लखनऊ तर 24 नोव्हेंबरला अहमदाबाद ते मुंबई मार्गावरील एक्सप्रेस बंद करण्यात येत आहेत. आयआरटीसी ही रेल्वे प्रशासनाची खासगी उपकंपनी असून यामार्फत देशात खासगी एक्सप्रेस सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. कोरोना काळात या गाड्यांच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र विशेष फेऱ्यांमध्ये ही या गाड्यांना हवा तास प्रातिसाद नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे आयआरटीसीचे प्रवक्ते सिद्धार्थ सिंह यांनी स्पष्ट केले आहे .
खर्च अधिक, उत्पन्न कमी
या विशेष गाड्या चालवण्यासाठी साधारण एका दिवसासाठी 15 ते 16 लाखांचा खर्च येतो. मात्र सध्या या फेऱ्यांचे उत्पन्न घटले असून केवळ 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 17 मार्चला या गाड्यांच्या फेऱ्या लॉकडाऊनमध्ये थांबण्यात आल्या होत्या. त्या नंतर 17 ऑक्टोबरपासून सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र पूर्ण क्षमतेच्या तुलनेत 25 टक्के प्रतिसाद लाभत असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.