मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवलेली धार्मिकस्थळे येत्या नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(24 सप्टेंबर) जाहीर केला. दरम्यान, आरोग्याच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
हेही वाचा - पुन्हा घंटा वाजणार.. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू, मात्र.. शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली
- नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून धार्मिकस्थळं होणार सुरू -
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पहिली लाट ओसरत असतानाच दुसऱ्या लाटेचा मोठा फटका सर्वांना सोसावा लागला. दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याचा इशारा टास्ट फोर्सने दिला. तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र, हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल केले आहेत. लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे धार्मिकस्थळे उघडण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
- नियमांचे पालन करावे - मुख्यमंत्री
दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये उतार दिसून येत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून धार्मिकस्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. धार्मिकस्थळे भक्तांसाठी खुली केल्यानंतर त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर व्हायला हवा. या नियमांचे पालन होते की नाही याची सर्वस्वी जबाबदारी धार्मिकस्थळांच्या व्यवस्थापन समितीवर टाकण्यात आली आहे. त्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - Guidelines for Schools : शाळा सुरू झाल्यानंतर 'या' नियमांचं करावं लागेल पालन