मुंबई - काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा आज सायंकाळी साडेसहा वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथे शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार असून या शपथविधीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात...पाहा सेट
चार दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असल्याने अद्यापही त्यांच्यावरील नाराजी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काही प्रमाणात असल्याने तूर्तास त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ सुत्रांकडून सांगण्यात आले. तर, या शपथविधीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या कार्यक्रमात अजित पवार यांना मंत्रिमंडळात एक विशिष्ट मान देण्यात येणार असला तरी तूर्तास त्यांना उपमुख्यमंत्रिपद हे देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीकडून ठरवण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा - आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार - शिवसैनिकांच्या भावना
शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमात छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली जाण्याची जोरदार चर्चा आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शपथ दिली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सर्वसमावेशक कार्यक्रम सायंकाळी चार वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केले जाणार आहे. त्या दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोण-कोणत्या नेत्यांना शपथ दिली जाईल, हे स्पष्ट केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांना वगळले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून आज देण्यात आली.
दरम्यान, सकाळपासून अजित पवार हे 'नॉटरिचेबल' असल्याने राष्ट्रवादीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर येऊन माझ्यासोबत अजितदादा हेही शपथविधीच्या कार्यक्रमाला येत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीत निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण थोडेसे निवडले असले तरी अजितदादा यांना आज होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमात स्थान दिले जाईल का, हा विषय अद्याप स्पष्ट झाला नसल्याचे समोर आले आहे.