मुंबई - राज्यात बियाणे पुरवठ्याच्या नियोजन आराखड्याप्रमाणेच विशेष बाब म्हणून सोयाबीन या पिकासाठी १० ते २० टक्के जास्तीचा बियाणे पुरवठा करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सोयाबीन बीज उत्पादक कंपन्यांना केले. दरम्यान, महाबीज कंपनीव्दारे राज्यात सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे गतवर्षीप्रमाणेच ठेवले आहेत. त्यात दरवाढ करण्यात आलेली नाही. खासगी कंपन्यांनी देखील पुढाकार घेऊन त्यांच्याकडील सोयाबीन बियाणे विक्रीचे दर शेतकऱ्यांना परवडतील असे ठेवावेत, अशाही सूचना भूसे यांनी केल्या. मंत्रालयात कृषीमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन, कापूस व मका पिकांच्या बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सर्व बियाणे उत्पादकांची बैठक पार पडली. बैठकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे व बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
'गावपातळीवर उगवण क्षमता तपासा'
राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिक स्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर केले आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातून बोध घेऊन यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करतानाच शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृतीसाठी विशेष मोहीम घेण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.
जनजागृती करण्याचेही सांगितले.
'तक्रारींच्या संशोधनासाठी पुढाकार घ्या'
राज्यातील कृषि विद्यापीठांनी सोयाबीन उगवणशक्तीच्या उद्भवणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच उन्हाळी हंगामातील सोयाबीन लागवड यावर्षी राज्यात बऱ्याच ठिकाणी हाती घेण्यात आली. यावर देखील सविस्तर संशोधन होऊन राज्यातील शेतकऱ्यांना शिफारसी द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. महाबीजने शासकीय प्रक्षेत्रे व कृषि विद्यापीठाकडील प्रक्षेत्रांचा पुरेपुर वापर करुन जास्तीत जास्त गुणवत्तापुर्ण बियाणे शेतकऱ्यांसाठी उत्पादित करावे, अशी सूचना कृषिमंत्र्यांनी यावेळी केली.
यंदा कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज
यंदा पावसाळा वेळेवर आणि नियमी1त असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून बियाणे कंपन्यांनी अतिरीक्त बियाणे राज्यासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी.कापसावर फवारणी आणि वेचणी करणाऱ्या मजुरांना प्रशिक्षण द्यावे. बियाणे कंपन्यांनी देखील पुढाकार घ्यावा. तसेच अन्य राज्यांतून बेकायदा बियाण्यांची विक्री राज्यात होऊ नये, यासाठी कृषि विभागाने सतर्क राहावे, असे भुसे यांनी यावेळी दिल्या.