मुंबई - वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी कोस्टल रोड प्राधिकरण करत कसलेल्या कामाच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी कोस्टल रोडचे काम बंद केले आहे. मच्छिमारांची एकही मागणी मान्य न करता मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे. आज मच्छिमारांकडून अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वरळी कोळीवाड्यात वातावरण चिघळले असून मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स आणि आरसीएफ तैनात करण्यात आले आहे.
'मच्छिमार मासेमारी करण्यापासून वंचित'
कोस्टल रोड प्राधिकरणाने परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्याने मच्छिमारांच्या जाळ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशी माहिती येथील नितेश पाटील व रुपेश पाटील यांनी दिली.
तोपर्यंत कोस्टल रोड बंद -
मच्छिमारांनी आता पर्यंत समतोल भूमिका घेतली होती. परंतु, आता प्राधिकरणाच्या अशा हुकूमशाही पद्धतीच्या कामकाजावर आळा घालण्यासाठी आणि प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी मच्छिमारांनी तीव्र भूमिका घेतली आहे. जो पर्यंत मच्छिमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत कोस्टल रोडचे काम बंद करण्याची भूमिका घेतली आहे.
दुर्घटना झाली तर जबाबदारी कोण घेणार?
मासेमारीसाठी जाण्यासाठी समुद्रातील मार्गात असलेल्या दोन पिलरच्या मधील अंतर २०० मीटर ठेवण्याची असून प्राधिकारण त्याचे अंतर ६० मीटर ठेवावे ही येथील मच्छिमारांची मुख्य मागणी आहे. उद्या जर दुर्घटना झाली तर त्याची जबाबदारी कुठल्याही विभागाने स्वीकारली नसल्याच्या आरोप येथील मच्छिमारांनी केला.
हेही वाचा - नाशिक - झिरवाळ यांनी पारंपारिक पध्दतीने साजरी केली दिवाळी