मुंबई महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी पुन्हा ज्येष्ठ विधिज्ञ व कायदेतज्ञ अॅड मिलिंद थोबडे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दिनांक 15 ऑगस्टला झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे. या अगोदर 2011 मध्ये पहिल्यांदा बार कौन्सिलचे अध्यक्ष पदी निवड झाली होती.
सुप्रसिद्ध वकील म्हणून मानाचे स्थान अॅड मिलिंद थोबडे यांनी सन 1983 मध्ये आयएलएस विधी महाविद्यालय पुणे येथून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे वडील तथा सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड काकासाहेब थोबडे यांचेकडे वकीली व्यवसायास सुरुवात केली व कायद्याचे प्रशिक्षण घेतले. अॅड मिलिंद थोबडे यांनी संपुर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक नावाजलेले फौजदारी खटले चालवुन विधीक्षेत्रात यशस्वीपणे सुप्रसिद्ध वकील म्हणून मानाचे स्थान प्राप्त केले आहे. सन 2005 मध्ये अॅड मिलिंद थोबडे यांनी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे.
बार कौन्सिलचे अध्यक्षपदी प्रथमतः बिनविरोध निवड विधीक्षेत्रात काम करत असताना वकिलांना दैनंदिन व्यवसायात येणाऱ्या अडी अडचणी लक्षात घेऊन अॅड मिलिंद थोबडे यांनी सन 2010 मध्ये बार कौन्सिलची निवडणूक लढविण्याचे ठरवून निवडणूक लढविली. महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये ऐतिहासिक सर्वाधिक पहिल्या पसंतीची मते मिळवून बार कौन्सिल सदस्य म्हणून निवडून आले. अॅड मिलिंद थोबडे यांचे वकीलांकरीता केलेल्या कार्याची दखल घेत सन 2011 मध्ये त्यांची बार कौन्सिलचे अध्यक्षपदी प्रथमतः बिनविरोध निवड करण्यात आली. अॅड मिलिंद थोबडे यांनी आपल्या कारकीर्दीत बार कौन्सिलच्या माध्यमातून वकील व त्यांचे कुटुंबीयाकरीता विमायोजना नवोदित वकीलांना कायदेविषयक प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन, वकिलांना न्यायाधीश होण्याकरिता प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन, कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन, वकीलांना कायद्याची अद्ययावत माहिती करुन देणारे साॅफटवेअर सवलतीच्या अल्पदरात उपलब्ध करून देणे, नवोदित वकीलांना सवलतीच्या दरात लॅपटॉप उपलब्ध करून देणे, वकीलांची वैद्यकीय बिलाचा परतावा देणे, मृत वकिलांच्या वारसांना आर्थिक सहाय्य देणे, अशा अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या असुन ते गेल्या अनेक वर्षांपासून वकिलांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यानंतर अॅड मिलिंद थोबडे हे सन 2019 मध्ये बार कौन्सिलचे सदस्यपदी पुनश बहुमताने निवडून आले.
कै.काकासाहेब थोबडे फाउंडेशनची स्थापना -अॅड मिलिंद थोबडे यांनी कै.काकासाहेब थोबडे फाउंडेशनची स्थापना केली. त्यामार्फत ज्येष्ठ विधिज्ञ व समाजसेवा पुरस्कार देणे, गरजु नवोदित वकीलांना मोफत कायद्याची पुस्तके देणे, युट्यूब चॅनलद्वारे उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे दैनंदिन नवनवीन निकालांची अद्ययावत माहिती व विश्लेषण देणे, ख्यातनाम वकीलांचे व न्यायमूर्तींचे कायदेविषयक मार्गदर्शन प्रसारीत करणे असे उपक्रम राबवून विधीसेवेत उल्लेखनीय योगदान देत आहेत. अॅड मिलिंद थोबडे यांच्या कार्याचा गौरव करून बार कौन्सिलचे सर्व सदस्यांनी एकमताने महाराष्ट्र व गोवा राज्यातील जवळजवळ अडीच लाख वकीलांचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना दुसऱ्यांदा संधी देत मुंबई येथे बार कौन्सिलच्या अॅड राजेंद्र उमाप यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर अॅड विवेकानंद घाटगे यांची निवड करण्यात आली व त्यांनी बार कौन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. अॅड मिलिंद थोबडे यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व वकीलवर्गाकडून स्वागत होत आहे.