मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी तारीख महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर केली आहे. दहावी उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना 16 ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेशासाठी दोन टप्प्यात अर्ज भरता येणार आहेत.
हेही वाचा - अरे काय, डोसा बनवताय का? 10 मिनिटांत तीन विधेयके मंजूर केल्यावरून विरोधकांचा सवाल
- प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द केली होती. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यामुळे अकरावी प्रवेशाबाबद विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राज्य शिक्षण महामंडळाने यंदा अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेश परीक्षा घेणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक असणार आहे. आता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी तारीख शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. दहावी उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना 16 ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेशासाठी दोन टप्प्यात अर्ज भरता येणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना मॉकडेमोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा शुक्रवारपर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यात मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार आहेत.
- प्रवेश प्रक्रियेपूर्वी सीईटी परीक्षा होणार -
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच नागपूर नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती या सहा महानगरपालिका क्षेत्रातील अकरावीच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रातील अकरावीचे प्रवेश स्थानिक पातळीवरून केले जाणार आहेत. मात्र, प्रवेश प्रक्रियेपूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, सीईटी परीक्षेपूर्वी अर्जाचा पहिला भाग आणि परीक्षेनंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.
- असा करा अर्ज -
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 16 ऑगस्टपासून प्रत्यक्षात ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. पहिल्या टप्प्यात सीईटी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्राथमिक माहितीसोबत शुल्क भरुन अर्ज लॉक करायचा आहे. त्यानंतर सीईटी परीक्षेत मिळालेले गुण आणि पसंती क्रमांक यानुसार अर्जाचा दुसरा भाग भरावा लागणार आहे.
- शंभर गुणांची होणार सीईटी परीक्षा-
ही परीक्षा इंग्रजी, गणित भाग १ आणि भाग २, विज्ञान आणि समाजशास्त्र या चार विषयांना प्रत्येकी २५ गुणांची म्हणजे १०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगु, हिंदी या आठ माध्यमांपैकी एक किंवा दोन माध्यमातील प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाने घेण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. या विषयांमधील कोणत्या अभ्याासक्रमावर प्रश्न येणार आहेत हेही मंडळाने जाहीर केले आहे.
हेही वाचा - बापरे... मुलगी टेरेसवरून पडली चौथ्या मजल्याच्या खिडकीवर, अग्निशमन दलाने बचावले