मुंबई - आता बोलायची नाही तर काम करण्याची वेळ आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. वरळी विधानसभा मतदार संघातून विजयी झाल्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.
वरळी विधानसभा मतदार संघामधून ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली. या मतदार संघात झालेल्या एकतर्फी लढतीत आदित्य ठाकरे यांना 89248 मत मिळाली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या डॉ. सुरेश माने यांना 21821, वंचित बहुजन आघाडीचे गौतम गायकवाड यांना 6572, तर बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना 781 मत मिळाली. आदित्य ठाकरे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेश माने यांचा 67 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला.
आदित्य ठाकरे यांनी वरळी मतमोजणी केंद्रात येऊन निवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडून स्वीकारले. यावेळी पत्रकारांशी बोलताना आता बोलायची वेळ नाही काम करण्याची वेळ आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत बंधू तेजस ठाकरे आणि सचिन अहिर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.