मुंबई - काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या आणि निवडणुकीनंतर काँग्रेसला सोडचिट्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी शिवबंधन बांधले. विधान परिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचे नाव राज्यपालांकडे पाठवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहेत.

मातोंडकर शिवसेनेतच
उर्मिला मातोंडकर या शिवसेनेतच असून त्या पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली होती. अनेक दिवसांपासून त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या सोमवारी प्रवेश करतील असेही ठरले होते. मात्र, अखेर आजचा प्रवेशाचा मुहूर्त ठरला आणि त्यांनी प्रवेश केला.

विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांचे नाव दिले आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा देत राजकारणापासून दूर गेलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या नावांची शिफारस
विधान परिषदेच्या १२ नावांमध्ये काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वणगे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडी कार्यकाळ पूर्ण करेल; शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचा विश्वास