मुंबई - महाराष्ट्रात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये या पूराने अक्षरश: कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर जीथे-जीथे नुकसान झालेले आहे, त्या भागातील नागरिकांना आवश्यक ती मदत करण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे. तसेच, या मदतकार्यात अनेक सेवाभावी संस्थाही उतरल्या आहेत. यामध्ये आता अभिनेता सोनू सूद प्रामुख्याने ग्रामीण भागात मदत करण्यासाठी मैदानात उतरला आहे.
'ग्रामीण भागांमध्ये मदत'
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारही समोर आले आहेत. अभिनेता सोनू सूद याने तळागाळातील लोकांना मदत पोहचेल या दृष्टीने ही मदत केली आहे. यामध्ये सोनू सूदने चिपळूण, महाड आणि इतर अनेक ग्रामीण भागांमध्ये मदत पॅकेज पाठवले आहेत.
'मूलभूत वस्तू मिळणे गरजेचे'
“महाराष्ट्रातील अनेक गावे पूरामुळे गंभीरपणे प्रभावित झाली आहेत. ही सर्व प्रमुख महामार्गांपासून २०-३० किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे तेथे मदत साहित्य पोहोचले नाही. आम्ही या गावांच्या सरपंचांशी आधीच बोललो आहोत. मूलभूत गरजेच्या वस्तू जसे बादल्या, पेले, भांडी, चटई, कपडे आणि अगदी अन्न साहित्य आदी सर्व पाठवले जात आहे. ती कुटुंबांना वैयक्तिक पातळीवर देण्यासाठी माझी टीम तेथे असेल. काही ट्रक पोहोचले आहेत आणि आणखी काही ट्रक्स काही दिवसांनी पोहोचतील.” अशी माहिती सोनू सूदने दिली आहे.
'१००० हून अधिक घरांना मदत'
‘बरीच मदत सामग्री महामार्गांच्या जवळच्या ठिकाणी आधीच पोहचली आहे, परंतु आतील गावे अजूनही योग्य गरजा मिळण्यापासून वंचित आहेत. क्षेत्रपाल, रुद्राणी, दोंडाशी आणि इतर अनेक गावांना त्यांच्याकडून मदत साहित्य मिळेल. संपूर्ण प्रदेशातील १००० हून अधिक घरांना ही मदत सामग्री दिली जाईल आणि मदत साहित्य असलेले अजून काही ट्रक्स ४ दिवसात गावांपर्यंत पोहोचणार आहेत.
'सूद चॅरिटी फाउंडेशनची टीम प्रत्येक व्यक्तीला मदत करते'
ग्रामस्थांना पुरेसे मदत साहित्य वितरित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे, जेणेकरून ते इतक्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या पायावर उभे राहू शकतील’, असे सोनू म्हणाला आहे.‘सूद चॅरिटी फाउंडेशनची टीम प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी त्यांच्या पातळीवर सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. या गरजू लोकांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहनही सोनू सूदने केले आहे.