मुंबई - सिने अभिनेत्री कंगना रणौतच्या वांद्रे पाली हिल येथील "मणीकर्णिका" या कार्यालयावर पालिकेने कारवाई केली होती. यानंतर आता कंगनाच्या खार येथील घरामधील अनधिकृत बांधकामाबाबत कोर्टाने दिलेला स्टे उचलण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. हा स्टे उचलल्यास कंगनाच्या खार येथील घरावरही तोडक कारवाई होऊ शकते.
कंगना रणौतचे वांद्र्यातील पाली हिल स्थित नर्गिस दत्त रस्त्यावर "मणीकर्णिका" प्रोडक्शन हाऊस नावाचे कार्यालय आहे. हे कार्यालय वास्तविक पाहता रहिवासी घर होते. कंगनाने त्यात बदल करून त्याचा व्यावसायिक वापर केला होता. या वास्तूत अनेक बेकायदेशीर बदल करण्यात आल्याने पालिकेने त्याला नोटीस देऊन बांधकाम तोडले. यावर काही मुंबई उच्च न्यायालयाने स्टे आणला. या प्रकरणी कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून आज गुरुवारी त्याची सुनावणी होणार आहे. हे प्रकरण ताजे असतानाच कंगनाच्या खार येथील ‘डी बी ब्रिज’ या इमारतीमधील घरातही अनधिकृत बांधकाम केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कंगनाचे खारमध्ये रस्ता क्रमांक 16 वर ‘डी बी ब्रिज’ या इमारतीत 6 हजार चौरस फुटाचे घर आहे. या इमारतीतील संपूर्ण पाचवा मजला कंगनाने विकत घेतला आहे. मात्र, या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे पालिकेच्या निदर्शनास आल्याने पालिकेने कंगनाला एमआरटीपीची नोटीस दिली होते. त्याविरोधात दिंडोशीच्या दिवाणी न्यायालयात खटला सुरू होता. दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये कंगनाने त्यावर स्टे मिळवला होता. मात्र, आता पालिकेने कंगनाने अनधिकृतपणे केलेल्या घरातील बदलांवर हातोडा चालवण्याची परवानगी द्या, अशी याचिका नव्याने न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर येत्या 25 सप्टेंबरला दिंडोशी न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोर्टाने स्टे उचलल्यास कंगनाच्या खार येथील घरावरही तोडक कारवाई होऊ शकते.