मुंबई - गोरेगाव पूर्व येथील सामना परिवार येथील भागात भंगार गोदामांना लागलेल्या भीषण आगीत काही गोदामे, दुकाने, झोपड्या जळून खाक झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. ही आग काल मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता लागली. पहाटे ६ वाजता म्हणजेच ११ तासांनी आगीवर संपुर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
भीषण आग
गोरेगाव (पूर्व) अरुण कुमार वैद्य मार्ग, खडकपाडा, सामना परिवार, रत्नागिरी हॉटेल, टारमेंट कंपनीच्या बाजूला वसलेल्या भंगार गोदामांना मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास आग लागली. १५ ते २० हजार चौरस फूट जागेतील भंगार मालाची गोदामे, झोपड्या, कारपेंटरची दुकाने आदींना आग लागली. ही आग हळूहळू पसरली व भडकली. भीषण आग व काळ्या धुराचे लोट यामुळे त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला हटवले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र आगीची भीषणता वाढल्याने सायंकाळी ७.१७ वाजता आगीचा स्तर -२ झाल्याचे घोषित करण्यात आले. तर आणखीन अर्ध्या तासात आग आणखीन भडकल्याने सायंकाळी ७.४६ वाजताच्या सुमारास आगीचा स्तर -३ झाल्याचे घोषित करण्यात आला.
साडे नऊ तासांनी आग आटोक्यात
काल मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास लागलेली आग विझवण्याचा अग्निशमन दल प्रयत्न करत होते. १२ फायर इंजिन, ७ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने पहाटे ४.१५ वाजता म्हणजेच तब्बल साडेनऊ तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुमारे साडेनऊ तासांनी आग आटोक्यात आली आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली याची चौकशी मुंबई पोलिस व मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
निरूपम यांची टिका
या आगीची दखल राजकीय नेत्यांनीही घेतली असून काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. निरुपम यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संजय निरुपम म्हणतात, 'गोरेगाव पूर्वेला असलेल्या रत्नागिरी हॉटेलाच्या मागे भयंकर आग लागली आहे. अग्निशमन दलाचे बंब पोहोचले आहेत. यानंतर तपास होईल. खात्रीने तिथे बेकायदेशीर कामे चालत असण्याचे पुरावे सापडतील. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची त्यात हातमिळवणी असल्याचे स्पष्ट होईल. कोणतीही कारवाई होणार नाही. यानंतर आणखी कुठे आग लागेल. त्यानंतर पुन्हा चौकशीचे तमाशा होईल.
हेही वाचा- भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन
हेही वाचा- पंतप्रधान मोदी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद; कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाचा घेणार आढावा