मुंबई - अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढत असून येथे कोरोनाच्या म्युटेशनमध्ये बदल झाल्याची अर्थात येथे नवीन भारतीय स्ट्रेन आढळल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यानुसार अमरावती, यवतमाळ, पुणे आणि सातारा येथील 262 नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 62 अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. अर्चना पाटील, संचालक, आरोग्य सेवा यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बाब आहे, पण जोपर्यंत उर्वरित 200 नमुन्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत धाकधूक कायम असणार आहे.
अमरावतीत कोरोनाचा कहर
डिसेंबरपासून राज्यात दिवसाला 2500 रुग्ण आढळून येत होते. पण मागील 15 दिवसात कोरोना वाढला असून दिवसाला 4 हजार, 5 हजार करत आता मागील चार दिवसांपासून 8 हजारांच्यावर रुग्ण 24 तासात आढळत आहेत. यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. मात्र त्याचवेळी अमरावतीने चिंता अधिक वाढवली आहे. कारण येथे दिवसाला 800च्या वर रुग्ण आढळत असून येथे कोरोनाच्या म्युटेशनमध्ये बदल झाल्याचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमरावतीतील अचलपूरमध्ये तर कुटुंबच्या कुटुंब बाधित झाली आहेत. त्यानुसार अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुण्यातील 262 स्वॅब तपासणीसाठी एनआयव्हीसह अन्य संस्थांकडे पाठवण्यात आले होते. दरम्यान, या तपासणीत हा परदेशी ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेतील वा ब्राझीलमधील स्ट्रेन नसल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. हा भारतीय स्ट्रेन असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे यादृष्टीने एनआयव्हीमध्ये याची तपासणी केली जात आहे. दरम्यान, अमरावतीतील कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी तिथे लॉकडाऊन करण्यात आला असून इतर नियमांचे कडक पालन केले जात आहे.
वेगाने पसरणारा स्ट्रेन
अमरावतीत भारतीय स्ट्रेन आढळला असून तो 70 टक्के वेगाने पसरतो. त्यामुळे तो अधिक घातक आहे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पण आरोग्य विभागाकडून मात्र जोपर्यंत एनआयव्हीचे अहवाल येत नाहीत आणि या स्ट्रेनबाबतची योग्य माहिती समोर येत नाही तोपर्यंत काही बोलणे योग्य नाही. पण कोरोना आहे, तो वाढत आहे, मग तो कोणत्याही प्रकारचा असो त्याला आपल्याला रोखायचे आहे. त्यासाठी सर्वात आधी मास्क लावायचा आहे आणि सर्व नियमांचे पालन करायचे आहे. तर कोणतीही लक्षणे आढळल्यास टेस्ट करून घ्यायची आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने राज्यात सर्व प्रकारचे प्रयत्न कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येत आहेत. तर आता एनआयव्हीकडील 62 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 200 अहवाल येणे बाकी आहे. हे अहवाल आल्यास चित्र स्पष्ट होईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले आहे.