मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरावर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रायडेंट होटेल, कुलाब्यातील ताज पॅलेस हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा रुग्णालय, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा या ठिकाणी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत शेकडो जणांचा जीव घेतला होता तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात 166 जण मृत्युमुखी पडले तर 300 हुन अधिक जण जखमी झाले होते.
नवीन शहीद स्मारकाचे बांधकाम युद्धपातळीवर
अजमल कसाबसह आलेल्या 9 दहशतवाद्यांचा सामना मुंबई पोलिसांच्या जाबाज अधिकाऱ्यांनी मोठ्या हिमतीने केला होता. यामध्ये अजमल कसाबला जिवंत पकडण्याचा प्रयत्न करणार्या तुकाराम ओंबळे, तत्कालीन एटीएस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे, 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' विजय साळसकर, पोलीस निरीक्षक शशांक शिंदे, एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन, एनएसजी कमांडो हवालदार गजेंद्र सिंग बिस्ट यांच्यासह तब्बल 18 जवानांना या दहशतवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आले.
नवीन शहीद स्मारक बांधले
मुंबई शहराच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 18 जाबाज पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलीस विभाग व मुंबईकरांकडून आदरांजली वाहण्यात येते. या अगोदर गेली 11 वर्षे मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या शहीद स्मारकावर पोलीस मानवंदना देण्यात येत होती. मात्र, या ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे याठिकाणी शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मानवंदना देता येणार नसल्यामुळे मुंबई पोलीस मुख्यालयात बांधण्यात आलेल्या नवीन पोलीस मुख्यालयाच्या इमारतीसमोर नवीन शहीद स्मारक बांधले जात आहे.
अतिशय युद्ध पातळीवर या शहीद स्मारकाचे काम सुरू असून या शहीद स्मारकावर 18 खांब उभे करण्यात आलेले आहेत. या 18 खांबांच्या मधोमध शहीद झालेल्या 18 जवानांची नावे शिलालेखावर कोरण्यात येणार आहेत. मुंबई पोलीस मुख्यालयातून यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.