मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत परदेश प्रवास केलेले १२ तर, जिनोम सिक्वेन्सिंगमधून १४१, असे एकूण १५३ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २९० झाली आहे. त्यापैकी ८२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा - ST Employees Dismissed - आज ११६ निलंबित कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ७१९ वर
रुग्णांचा आकडा २९० वर -
मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून १३ हजार ५३५ प्रवासी आले. त्यामधील ८९ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात १९६ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीच्या सहवासातील ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत परदेश प्रवास केलेले १३० (८० पुरुष, ५० स्त्री) तसेच १६० ( १०५ पुरुष, ५५ स्त्री) अशा एकूण २९० जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. एकूण २९० पैकी ७६ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.
नागरिकांनी भीती बाळगू नये -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे, गर्दीत न जाणे या कोविड नियमांचे पालन करावे. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी त्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.