मुंबई: राज्यात आज कोरोनाचे १,२०२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधीक संख्या असून राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के आहे. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोन मध्ये बऱ्यापैकी शिथीलता देण्यात आली असून खासगी डॉक्टर्स आणि शासन यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्री टोपे यांनी आज जनतेशी संवाद साधला
टोपे म्हणाले, ''पावसाळा तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरू करणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यात नॉन रेड झोनमध्ये बाजारपेठा, दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करावेत यासाठी शासन आणि त्यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे.
''आरोग्य विभागातील डॉक्टर्स, विशेषज्ञ, नर्स, कर्मचारी यांची १७ हजार रिक्त पदे येत्या दोन महिन्याच्या आत भरण्यात येतील. त्यासाठी काल विभागाची सविस्तर बैठक घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक असणाऱ्या मुलाखतीदेखील घेतल्या जातील आणि ही पदे भरले जातील,'' असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, ''राज्यात रुग्ण हा केंद्रबिंदू मानून धोरण राबविले जात आहे. रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूट थांबविण्यासाठी दरनियंत्रण कायदा केला आणि त्याच्या सक्षम अंमलबजावणीसाठी प्राधीकारीही नेमले आहेत. राज्यात कोरोनाच्या प्रतिकारासाठी साधनांची अजिबात कमतरता नाही. मुंबईत सध्या खाटांची कमतरता जाणवत आहे. मात्र ही परिस्थिती कायम राहणार नाही. गेल्या काही दिवसंपासून बीकेसी, वरळी डोम, गोरेगाव येथे कोरोना केअर सेंटर उभारणी केली जात आहे. कोरोना केअर सेंटर या वर्गवारीमध्ये एक लाख खाटा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोना हेल्थ सेंटर वर्गवारीमध्ये अतिरिक्त १५ हजार खाटा तर अतिदक्षता विभागाच्या २००० खाटा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
''खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा घेण्यात येणार असून शासन निश्चित दराने उपचार तेथे केले जातील. राज्यात दिवसाला सुमारे १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी ६७ प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत. राज्याचा मृत्यूदर हा ३.२ टक्के एवढा असून रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्के आहे. नागरिकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांप्रति आपली वर्तणुक चांगली ठेवावी. माणसाने माणाशी माणसाप्रमाणे वागावे ही आजची गरज असून कोरोनाबाधीतांना हीन वागणीक देऊ नका. मुंबई, पुण्याहून येणाऱ्या नागरिकांशी वागताना वर्तणुकीतली माणुसकी घालवू नका असे राजेश टोपे म्हणाले.
मालेगावातील मृत्यूदर कमी होत आहे. तेथे खासगी दवाखाने बंद असल्याचा काळात मृत्यूचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर तेथे जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांना विश्वासात घेतले त्यानंतर खासगी दवाखाने सुरू झाले. आता त्याचे परिणाम दसू लागले असून मृत्यू दर खाली आला आले. राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या मालेगावमध्ये टेली रेडीओलॉजी सुरू केली आहे. भयभीत झालेल्या लोकांना विश्वास दिल्याची शेवटी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.